तात्या ऊर्फ तंट्या भिल्ल चा जन्म मध्यप्रदेशातील निमाड जिल्ह्यात पोखर या गावी इ.स.१९४२ मध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नांव भाऊसिंग. शेतीवाडी करून तो कुटुंबीयांचे पालनपोषण करी. भाऊसिंगचा मुलगा तात्या. त्याला लहानपणापासून तालमीची आवड होती, वयाच्या १४ वर्षा पर्यंत त्याने वडिलांबरोबर शेतीवाडी करण्यात घालविली, एके दिवशी उधळलेल्या रेड्याने गावात धुमाकूळ घालून हाहाकार उडविला. रेड्याला आवरण्याचे धाडस कोणी करेना. त्यावेळी तात्या हिंमत दाखवून पुढे आला. मोठ्या युक्तीने आणि चपळाईने त्याने रेड्याची शिंगे धरली आणि रेड्याला त्याने धरून आणले. ह्या प्रसंगामुळे तात्याच्या नावाचा व त्याच्या प्रचंड ताकदीचा सर्वत्र बोलबाला झाला. लोक त्याची वाहवा करू लागले, काही दिवसांनी तात्याचे आई-वडील वारले. वडिलांच आधार तुटल्याने तो दु:खी-कष्टी झाला. वडिलांची शेती तात्याला पाहावी लागली. त्याच्या वडिलोपार्जित शेतीत त्याच गावचा शिवाजी पाटील नावाचा सधन शेतकरी वाटेकरी होता. तात्याचे वडील वारल्यानंतर त्याची सर्व जमीन शिवाजी पाटील या वाटेकऱ्याने बळकावली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने तात्यावर चोरीचा आळ लादून त्याची तुरुंगात रवानगी केली. तात्याला या कृत्यामुळे खूप यातना झाल्या. मन मारून त्याने वर्षभर सजा भोगली. एक वर्ष तुरुंगात सजा भोगून तात्या पुन्हा गावी परत आला. परंतु जमीनदार मंडळींना तात्याला सुखाने राहू द्यायचे नव्हते. त्याला पुन्हा दुसऱ्या लफड्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू झाले. बनाव घडवून आणला गेला. एका जमीनदाराच्या मुलीने तात्यावर आळ घेतला. लोक त्याला बदनाम करू लागले. हा व्यर्थ त्रास नको म्हणून तात्याने शेवटी गाव सोडले व तो हिरापूर येथे जाऊन राहिला. पण तेथेही त्याच्यावर अनर्थ कोसळला, हिरापूरजवळच एक चोरी झाली होती. त्या चोरीचा आळ तात्यावर घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांकडून त्याला त्रास सुरू झाला. पोलीस त्याला धाकदपटशा दाखवून मारहाण करू लागले. अखेर या प्रकरणात तात्याला पुन्हा ३ महिने शिक्षा झाली. ही तीन महिन्यांची शिक्षा भोगून आल्यावर तात्याने ठरविले की, इंग्रजांच्या हद्दीत राहावयाचे नाही. त्याप्रमाणे तात्या इंग्रजांची हद्द सोडून होळकरांच्या हद्दीत सेवरे गावी रहावयास गेला. परंतु काही लोक त्याला चोर म्हणूनच ओळखू लागल आणि शिवारात झालेल्या कोणत्याही छोट्या मोठ्या चोरीशी त्याचा संबंध जोडला जाऊ लागला. त्याच सुमाराला सेवरे गावी चोरी झाली होती. त्या संधीचा फायदा घेऊन सुभान पाटलाने त्या चोरीत तात्याला पुन्हा गुंतविले. चोरीचा वहीम त्याच्यावर ठेवण्यात आला. खोटे साक्षीदार उभे करून तात्याला पकडण्यासाठी वारंटी काढण्यात आले. हे तात्याला कळल्यावर तो गाव सोडून डोंगरात पळून गेला व जंगलातच राहू लागला, स्वत:च्या संरक्षणासाठी हे करण्यासाठी त्याला दुसरा मार्गच उरला नव्हता. तात्याला पकडण्याचे प्रयत्न चालू झाले. काही लोकांनी त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला गावात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. डाव रचले जाऊ लागले. त्या गावच्या मोहनरावाला त्यात यश आले, मोहनरावाने गोड बोलून तात्याला गावात आणले. त्या संधीचा फायदा घेऊन पोलिसांनी गावाला वेढा घातला व तात्याला पकडले. बेड्या घालून खांडव्याला आणले आणि मॅजिस्ट्रेटपुढे उभे केले. त्यात त्याला पुन्हा शिक्षा होऊन तुरुंगात ठेवण्यात आले. ही शिक्षा मात्र तात्याला फलदायी ठरली. तुरुंगात त्याला काही सोबती मिळाले. तिसऱ्या रात्री तंट्या व त्याचा जोडीदार दौल्या त्या तुरुंगातून पळून गेले. ६० कोसांवर गेल्यानंतर त्यांनी पहिली विश्रांती घेतली, तेव्हापासून तात्याने लुटालूट करण्याचा संकल्प केला व त्यातून मिळालेले पैसे गोरगरिबांना तो वाटू लागला.

                इ.स.१८७८ ते १८८९ हा काळ तंट्या भिल्लाच्या कर्तबगारीने विशेष गाजला. त्याच्या धाडशी व लढाऊ वृत्तीमुळे लोक त्याची तुलना रॉबिनहुडशी करू लागले. सावकार, जमीनदार, इंग्रज, पैसेवाले यांच्या विरुद्ध तंट्याने बंडाचे निशाण उभारले. अनेक साथीदार त्याने गोळा केले. तरुण जवानांची पलटण उभी केली. तंट्याने या बंडाचे नेतृत्व तब्बल दहा वर्षे केले आणि उभ्या हिंदुस्थानात त्याचे नांव प्रसिध्दीला आले. परंतु फंदफितुरीमुळे इ.स.१८८० मध्ये तंट्याचे २०० जवान पकडले गेले. त्यात त्यांना शिक्षा झाल्या. पुढे त्यातील काही लोक जबलपूरच्या तुरुंगातून पळूनही गेले. त्यानंतर तंट्याने त्याच्या बंडखोरीत पुन्हा वाढ केली. इंदूर, स्टेट, इलिचपूर, होशंगाबाद या जिल्ह्यामध्ये त्याने बंडाळी करण्यास सुरुवात केली. इंग्रजांनी श्री.लोपेल ग्रीफीन यांच्या मार्गदर्शनाखाली तंट्याला पकडण्याचे प्रयत्न जारी केले. तंट्याला पकडून देणाऱ्याला पाच हजार रुपये इनामही जाहीर झाले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तंट्याची घोडदौड मात्र चालूच राहिली. तंट्याला समाजातील गोरगरीब मंडळींचा नेहमी पाठिंबा मिळत गेला. गरिबांचा मित्र म्हणून लोक त्याला ओळखू लागले. तंट्या पोलिसांच्या हालचाली सांगणाऱ्यांना व गोरगरिबांना दरोडे आणि लूटमारीतून मिळालेले धन उदार मनाने वाटत असे. स्त्रिया आणि मुलांना त्रास देणाऱ्यांचा तो कडक बंदोबस्त करी. स्त्रियांना त्याने दिलेली वागणूक थोरपणाची होती. त्याबाबतच्या अनेक कथा आजही प्रचलित आहेत. अनेक गरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी तंट्या पैसे देत असे. हुंड्यावाचून मुलींची लग्ने अडली असतील तर हुंड्यासाठी तंट्या पैसे देत असते. त्यामुळे गरीब लोक त्याला तंट्या मामा असे म्हणत,

                बरीच वर्षे पोलिसांशी मुकाबला केल्यावर एके दिवशी तंट्या पोलिसांच्या गोळीने जखमी झाला. त्यामुळे त्याची प्रकृती पुढे खालावत गेली. अनेक अधिकाऱ्यांनी सरकार दरबारी तुझी वकील करून तुझे सर्व गुन्हे माफ करून घेऊ; अशी आमिषे दाखवून त्याच्याकडून पैसे उकळले. इंदूरच्या आर्मी ऑफिसरला भेटण्यासाठी तंट्याला नेण्यात आले. तेथे त्याचा घात झाला. त्याचवेळी त्याला पकडण्यात आले.

                पुढे काही दिवस जबलपूरच्या कोर्टात त्याचा खटला चालला आणि इ.स.१८८९ मध्ये तंट्याला फाशीची शिक्षा जाहीर झाली. तंट्याला फाशी देऊ नये म्हणून नागपूर बारसंघाने तंट्याच्या बाजूने मुख्य कमिशनरकडे अपील केले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर इ.स.१८८९ मध्ये आदिवासींच्या या रॉबिनहुडला फाशी देण्यात आली.

logoblog

No comments:

Post a Comment

ads