धर्मधारणा संकल्पना व स्वरूप : प्रचलित अर्थाने हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम या धर्माचा निर्देश केला जातो. मराठी विश्वकोशात धर्माची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.
निसर्गातील, अत्यंत पवित्र, संपूर्ण
मानवी भवितव्याशी संबंध
जीवन व विश्व अथवा निसर्ग यांच्या नियंत्रक अशा अलौकिक शक्तीवर माणसाची श्रध्दा असते. त्या शक्तीचा स्वत:शी अनुकूल, पवित्र
व घनिष्ठ संबंध प्रस्थापित करणारी व्यक्ती अथवा
सामाजिक मन:प्रवृत्ती व त्यातून निघणारी आचरणाची पद्धती म्हणजे धर्म होय. (मराठी विश्वकोश
खंड-८, पृष्ट -१७) भारतीय
संस्कृती कोषात धर्माची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.
धृ-धारण करणे या धातूपासून धर्ज शब्द
बनला आहे. याची
व्याख्या धरती लोकन् ध्रियते पुण्यात्मभिः इति वा – जो लोकांना धारण करतो किंवा जो पुण्यात्मा पुरुषांकडून धारण केला जातो तो धर्म होय. (भारतीय संस्कृती
कोष खंड४, पृष्ठ -५५८) भारतीय धर्मसुत्रात ...धारयती: सा; धर्म:
अशी उक्ती आहे. अर्थातच
लोकधारणा करणाऱ्या तत्वज्ञानात्मक विचारसरणीला धर्म अशी संज्ञा प्रचलित दिसते. धर्मग्रंथ, तत्त्वज्ञान
आणि तत्त्वज्ञानाचे
आचरण अशी त्रिसूत्री ख्रिश्चन, मुस्लीम आणि शीख
आदी धर्म त्रिसूत्रीप्रमाणे विचारात घेता येतात. हिंदू धर्माच्या बाबतीत काहीसे वेगळे आहे. परंपरागत
परिवर्तनशीलतेने आलेल्या
सांस्कृतिक वर्तनपरंपरांना यात महत्त्व आहे. धर्मातील तत्त्वज्ञानांचा संबंध त्या-त्या मान्य केलेल्या देवतांशी जोडला
जातो. देवतांविषयी पूज्य भाव मानून समाजधारणेसाठी नीतितत्वे धर्मात मांडलेली असतात. त्या
नीतितत्वांनाच आचरणात कर्मकांडाचे
स्वरूप आलेले असते.
धर्माचे
स्वरूप एकेश्वरवादी किंवा अनेकेश्वरवादी किंवा निरीश्वरवादी, व्दैतवादी
आणि अद्वैतवादी असे दिसते. वर्तमानात ज्यांचा
धर्म म्हणून उल्लेख केला जातो. या सर्व धर्मांचा प्रवास सामान्यत: लिखित उपलब्ध प्रवास सामान्यत: अडीच हजार
वर्षाचा मानता येतो. सनातन आर्यधर्म,
वैदिकधर्म या नावाने भारतात
ओळखले जाणारे धर्म सामान्यत: लिखित उपलब्ध
पुराव्यानुसार दहा हजार वर्षापर्यंत मागे नेता येतात. या सर्व धर्मकल्पनांमध्ये आज ज्यांना आपण
आदिवासी जमाती म्हणतो त्यांच्या
धर्म धारणा वैशिष्ट्यपूर्ण ते ने , पृथक
स्वरूपात आपल्यासमोर
येतात. त्यांचे साम्य अनेक देवतावादी धर्मतत्वज्ञानाशी
दिसते.
आदिवासींचा धर्म :
आदिवासी दैवते, त्यांची
नितीतत्वे, सांस्कृतिक
आणि सामाजिक घटना आणि यावर आधारलेले समुहजीवन
यांचा एकत्रित विचार आदिवासी धर्मकल्पनेत करता येईल, वर्तमानात
निरीक्षण करीत असताना महाराष्ट्रातील आदिवासींचे
निरीक्षण विचारात घेतले तरी त्यात प्रामुख्याने लिंगस्वरूपातील देवता अर्थात महादेव हे सर्वसाधारण सर्वांना मान्य असलेले दैवत दिसते. याशिवाय
पृथ्वी किंवा माती, जलप्रवाह किंवा जल, वायू, सूर्य, चंद्र, वनस्पती, प्राणी आणि पूर्वज यांना
देवतास्वरूप मानलेले दिसते. त्या-त्या देवतांची शक्ती समाजधारणेला कशी उपयुक्त आहे या
विषयीच्या निश्चित कल्पना आदिवासीमध्ये
दिसतात, त्या
शक्तींचा संबंध जन्मप्रथा, विवाहप्रथा आणि मर्तिकप्रथांशी जोडलेला दिसतो.
आदिवासींची स्थानदैवते,
क्षेत्रीयदैवते आढळतात, त्यांची
साक्ष गावपंचायतीत महत्त्वाची असते.
पापपुण्याच्या कल्पना आणि सत्यनिष्ठा, लोकनिष्ठा, स्त्री- पुरुष
संबंधनिष्ठा या संबंधात निश्चित धारणा असतात. त्या संबंधाने गावपंचायतीत न्यायनिवाडा करण्याची प्रक्रियाही सुरू
असते. या सर्व तत्वांविषयी पारंपारीक श्रध्दा, दृढ विश्वास यासह अतिशय घट्टपणाने लोकधारणा झालेली दिसते. या स्वरूपातील दैवते त्या-त्या जमातीत वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी आकारलेली, मांडलेली प्रतिमांच्या स्वरूपात दिसतात. तसेच गावपंचायतीची नितीतत्वे ही देखील जमातीचे वैशिष्ट्यपूर्णतेने दाखविताना दिसतात. असे असले तरी या सर्व दैवतांचा आणि नीतीतत्वांचा विचार करता त्यात फार मोठ्या प्रमाणावर साम्य आढळते. आदिवासी धर्म हा माणसाच्या आदिमतेचे दर्शन घडविणारा आहे; असे विधान धार्मिक प्रचलनावरून करता येते. यात वर उल्लेखलेले सूर्य, चंद्र, पाणी, वायू, माती, वनस्पती आणि प्राणी अर्थातच ज्यांचा संबंध थेट माणसाशी प्रथम आला त्यांच्याशी निगडीत असलेला दिसतो आणि ह्या दैवतांचीच विविध रूपे दैवते म्हणून प्रकट झालेली असतात. माणसाच्या मूळ पुरुषापासून पूर्वजांची देवता म्हणून पुजा करण्याची परंपरा ही आदिम धर्मधारणेचे प्रतीक मानता येते. ही धर्मधारणा अन्य कोणत्याही प्रचलित धर्मात तेवढ्या तीव्र स्वरूपात दिसत नाही.
आदिवासीधर्मनीतिव्यवहार:
विशिष्ट नीतिव्यवहारांच्या आधाराने आदिवासी दृढ स्वरूपात
श्रध्दापूर्ण जीवन जगताना दिसतो. हा त्याचा नीतिव्यवहार चार गोष्टींच्या बाबतीत
वैशिष्ट्यपूर्णतेने घडताना दिसतो.
१) कुटुंब व्यवस्था व गावपंचायत
२) जन्मप्रथा
३) विवाहप्रथा
४) मर्तिकप्रथा
या चारही व्यवहारांच्या संदर्भात
त्याचे कर्मकांड पारंपारीक पध्दतीने अतीव श्रध्देने आणि गावपंचायतीच्या न्याय चौकटीत
कर्मठपणाने सुरू असते, कोणत्याही अटीतटीच्या प्रसंगातही आदिवासी हे नैतिक व्यवहार सोडीत
नाही किंवा टाळीतही नाही. यातून जे बाहेर पडताना दिसतात किंवा परिवर्तन स्वीकारतात
ते आदिवासी धर्मधारणेपासून दूर गेल्याचे लक्षात येते. भौतिक प्रगतीच्या, परकीय
आक्रमणांच्या, धार्मिक आक्रमणांच्या झपाट्यामध्ये आदिवासी धर्म, नैतिक
व्यवहार काहीसा बाधित झालेला जाणवतो. तथापि हे त्याचे बाधित होणे गावपंचायतीचा
धारणाशक्ती पुढे तात्कालिक स्वरूपाचे ठरते. याचा अर्थ आधुनिक भौतिक सोयीसुविधा,
शिक्षणव्यवस्था, पेहरावातील
बदल, नव्या भाषासंस्था आदिवासी स्वीकारीत नाही असे नाही, तथापि
या सर्व स्वीकारांना एक प्रकारे आगंतुक बांडगुळाप्रमाणे त्याने नैतिक व्यवहार
करताना स्वीकारल्याचे आढळते. आजच्या वैज्ञानिक, भौतिक
प्रगतीच्या झपाट्यातही त्याची धर्मनीती, व्यवहारांविषयीची धारणा दृढपणे टिकून
आहे असे जाणवते.
कुटुंब व्यवस्था आणि जातपंचायत
याबाबतीत जात पंचायतीच्या संकेताप्रमाणे आदिवासींच्या कौटूंबिकतेची उभारणी झालेली
दिसते. यात पती-पत्नी संबंध, पुनर्विवाह आदी कल्पना आणि नातेगोते
संबंध यांचा विचार नीतिपरंपरांशी घट्टपणे बांधलेला दिसतो. या परंपरामध्ये थोडीही
आगळीक झाली तरी जातपंचायतीचा न्याय मान्य करून प्रसंगी शिक्षा भोगण्याची त्यांची
तयारी असते. अशी शिक्षा स्वीकारण्यात त्यांना पाप क्षालनाचा अनुभव येतो. कुटुंब
आणि जातपंचायत यात सामाजिक व्यवहार होत असताना आदिवासी समाजातही हेवेदावे, ईर्षा, भांडणतंटे,
मत्सर,
सूडभावना
या सर्व मानवी प्रवृत्ती असतातच, परंतु गावपंचायतीपुढे सर्वांची शरणागती
असते. अशी घट्ट समाजधारणा आदिवासी जमातींमध्ये पाहावयास मिळते. जन्मप्रथेच्या
बाबतीत पती-पत्नी मीलनापासून ते अपत्याच्या जावळ विधीपर्यंतचे अनेक विधिसंकेत
विविध दैवतांशी जोडलेले दिसतात. या संकेतांची बंधने गरोदर स्त्री आणि तिचा पती व कुटुंबीय
पालन करताना दिसतात. विवाहप्रथेच्या संदर्भात स्वयंवर पध्दती, मागणी
पध्दती, पुनर्विवाह,
घरघुशी
पध्दती आदी अनेक प्रकार पंचायतीच्या मान्यतेने अवलंबिले जातात. विवाहाच्या
संदर्भातील तथाकथित नागर जीवनात किंवा ब्राह्मण्यग्रस्त जीवनात निर्माण झालेले कोणतेही
प्रश्न आदिवासी विवाहप्रथांमध्ये आढळत नाहीत. विवाह संदर्भात कुटुंबसंस्था आणि
सामाजिक घटनांची सोय परंपरेने स्वीकारलेली दिसते. हे आदिवासी विवाहसंस्थेचे
वैशिष्ट्य म्हणता येईल. मर्तिकप्रथांच्या बाबतीत पुरणे, मृताच्या
स्मरणार्थ स्तंभ, मुंढे,
वीर
उभारणे, अशौच पाळणे, गावकी जेवण घालणे, सामूहिक
दुखवटा पाळणे अशा प्रथा दिसतात. भूत, प्रेत, पिशाच्च,
करणी-कवटाळ
आदींवर दृढ विश्वास असून मृताम्यांच्या संचाराविषयीही विश्वास दिसतो.
मृतात्म्यांना संतुष्ट करण्यासाठी देवदेवतांप्रमाणेच जत्रा-यात्रा घालणेही सुरू
असतेच. देवलसी, मांत्रिक यांचे याबाबतीतील प्रस्थ, संदेश शिरोधार्थ
मानले जातात, रोगराई,
लागीर,
अपघात
आदिविषयी तसेच सर्पदंश, वाटचकवे
याविषयी अनेक समजुती प्रचलित असतात. त्याही बाबतीत मांत्रिक किंवा देवलसी यांचे
संकेत स्वीकारले जातात. एकूण आदिवासींचा धर्म, नीतिव्यवहार हा
परंपरेच्या घट्ट पायावर उभा आहे. या नीतिव्यवहारांना पाठबळ देणाऱ्या धर्मकल्पना
विपुल प्रमाणात आढळतात.
दैवतपुजा आणि जत्रा यात्रा :
आदिवासींची कुलदैवते, ग्रामदैवते,
क्षेत्रीयदैवते,
वीरदैवते
व प्राणीदैवते असतात. विशिष्ट तिथी, वार, नक्षत्रांना
त्यांच्या पुजा करण्याचे संकेतही असतात. ही दैवते अंगात संचारही करतात. अनेकदा
प्रत्येक कुटुंबात असे संचार पहावयास मिळतात. क्षेत्रीय दैवतांच्या आणि
वीरदैवतांच्या जत्रा करण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर दिसते. जत्रांमध्ये नवसायसांच्या
प्रथा दिसतात. आहाळावरून चालणे, काट्यावरून चालणे, उकळत्या
तेलात, पाण्यात हात घालणे असे काही थरारक विधीप्रकारही असतात. आदिवासींमध्ये
महादेवाची यात्रा आणि शक्तीमातांच्या जत्रा मोठ्या प्रमाणात दिसतात. शक्तीमातांचा
संचार मांत्रिकांमध्ये होतो.मात्र काही पितृदेवतांचा संचार होत असला तरी थेट महादेवाचा
संचार मात्र आदिवासींमध्ये दिसत नाही. महादेवाविषयी अतिशय उदात्त आणि मूलभूत
संवेदना त्यांच्यामध्ये दिसते. महादेव या दैवताच्या पिंडीमध्ये स्वयंभू त्रिमुखी
पिंडीचा आढळही मोठ्या प्रमाणावर होतो. याविषयी बोलताना आदिवासी दोन तव्हेने बोलतात.
आदिवासी धर्म मानवी संस्कृतीचा मुलस्त्रोत :
आदिवासी धर्माचे एकूण स्वरूपात लक्षात
घेतले तर तर माणसाची देव आणि नीतितत्वे मानण्याची सहजप्रवृत्ती लक्षात येते.
आदिवासी धर्मकल्पना ह्या माणसांच्या सृष्टीशी आलेल्या संबंधांच्या काळातील कल्पना
किंवा धारणा आहेत असे विधानही यावरून करता येते. सृष्टी कशी निर्माण झाली, माणसाचा जन्म कोणी घडविला आणि त्याचा
सांभाळही सृष्टी कशी करते आहे; या विषयीची
जिज्ञासा माणसाच्या आरंभबिंदू अवस्थेत माणसाच्या मनात निर्माण झाली असेल आणि
भरण-पोषण, जननप्रक्रिया, भयमुक्तता या सर्व संवेदनांच्या
समाधानासाठी सृष्टीकडे पाहताना पूज्य भाव निर्माण झाला असेल त्यातूनच सृष्टीने
दिले तेच सृष्टीला परत अर्पण करण्याची प्रथा आणि सृष्टीतील या दैवतस्वरूपात
मानलेल्या प्रतिमांकडेच सुखदुःखाची गा-हाणी घालण्याची प्रथा निर्माण झाली असावी.
यापेक्षा वेगळे स्वरूप वर्तमानातही कोणत्याही धर्मसंकल्पनांचे किंवा
धर्मअस्तित्वांचे दिसत नाही. आदिवासी धर्माची आणि नीतितत्वांची असलेली स्थिती हाच
मानवी संस्कृतीचा मुलस्त्रोत असावा असे सूचित करते. त्या दृष्टीने आदिवासी धर्म हा
सर्व धर्माच्या मुळाशी असलेला, सर्व
धर्मांना दैवतधारणांसह समाजधारणातत्वे पुरविणारा आहे; असे विधान करता येते.