आदिवासी पैकी महादेव कोळी ही एक लढवय्या जमात. अल्लाउद्दीन खिलजीच्या राजवटीपासून प्रत्येक राजवटीशी ते लढत अपवाद फक्त छत्रपतींच्या राजवटीचा. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मनोभावे मदत केली. त्यानंतर पेशवे आले. त्यांनी महादेव कोळ्यांचे हक्क आणि वतनदान्या काढून घेण्याचा सपाटा चालविला. त्यांनी पेशव्यांना प्रखर विरोध केला. त्यानंतर इंग्रजी राजवट आली. इंग्रजांनी पेशव्यांचाच कित्ता गिरविला. त्यामुळे इंग्रजाविरूध्द लढा करण्याशिवाय त्यांना दुसरा मार्गच नव्हता. इंग्रजांनी या लढाऊ परंपरेचा उपयोग केला. महादेव कोळ्यांशी सतत लढत बसण्यापेक्षा लढाईसाठी त्यांचा उपयोग करावा; असे काही वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांनी ठरविले. त्या दिशेने त्यांची पावलेही पडली होती. याकामी कॅनूताल नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. महादेव कोळ्यांच्या प्रदेशाची त्याला बरीच ओळख झाली होती. त्याने गावोगाव फिरून महादेव कोळी तरुणांची पलटण उभारली. इतिहासात प्रसिध्दीला आलेली महादेव कोळी पलटण ती हीच. या पलटणीचे नेतृत्व वीर राघोजी भांगरे यांचे धाकटे बंधू बापू भांगरे यांचेकडे देण्यात आले होते. या पलटणीचा उपयोग १८५७ मध्ये स्वातंत्र्ययुध्द मोडण्यासाठी इंग्रजांनी करून घेतला. या युध्दानंतर १८६१ मध्ये महादेव कोळी जमातीची ही पलटण विसर्जित करण्यात आली. पलटणीतील अनेक सैनिकांना पुढे पोलीस दलात सामील करून घेण्यात आले. महादेव कोळी लोकांचा कणखरपणा, काटक व पराक्रमी वृत्ती ब्रिटिश सरकारने चांगली ओळखली होती. त्यामुळे पहिले महायुध्द सुरू होण्यापूर्वी महादेव कोळी जमातीची अशीच पलटण उभी करण्याचे पुन्हा प्रयत्न झाले. त्यावेळी जमातीने त्यास मात्र साफ नकार दिला. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळीही इंग्रजांनी असेच प्रयत्न केले. त्यावेळी सरकारला लढाईत मदत करण्यापेक्षा सावकाराशी लढावे असे या जमातीत जनमत तयार झाले होते. पुढे त्या दिशेने पावलेही पडत गेली. व लवकरच त्यांच्या प्रदेशातून सावकारशाहीचे उच्चाटन झाले.

logoblog

ads