इंटरनेट ही एक जादूई दुनिया आहे. या दुनियेत माणसं न हरवतील तरच नवल.. इंटरनेटच्या या विश्वात एक से एक वेबसाईट्स आहेत, त्यापैकीच एक वेबसाईट म्हणजे https://www.innerbody.com/htm/body.html
मानवी शरीराच्या आतल्या रचनेची माहिती प्रत्यक्ष दाखवणारी ही एक फार रंजक अशी वेबसाईट आहे. यात मानवी शरीराच्या आतील रचना नीट वर्गीकरण करून दाखवलेली आहे.
शरीरशास्त्रानुसार मानवी देहाची जशी रचना केली जाते, त्यात ठळकपणे, हाडांची रचना, स्नायूंची रचना, ह्रदय व रक्तवाहिन्यांची रचना, श्वसनसंस्था, पचनसंस्था, मज्जासंस्था आदी निरनिराळ्या रचना प्रत्यक्षात कशा काम करतात, त्यात कोणते अवयव कशा पद्धतीने जोडले गेलेले आहेत हे सगळं केवळ माहितीच्या स्वरूपात न देता प्रत्यक्ष मानवी देहाची प्रतिकृती पडद्यावर साकारून त्यात दाखवण्यात आलेले आहे हेच या वेबसाईटचे विशेष म्हणावे लागेल.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला मानवी श्वसनसंस्थेचा अभ्यास करायचा असेल तर वेबसाईटवरील एनेटोमी टॅबवर क्लिक करताच तुमच्यासमोर मानवी देहाकृतीच्या काही इमेजेस येतील. त्या प्रत्येक इमेजच्या वर त्या त्या मानवीसंस्थेचे नाव देऊन त्यांची प्रत्यक्ष आंतर्रचना त्या सापळ्यावर क्लिक करताच तुम्हाला समोर दिसू लागेल. प्रत्येक अवयवावर क्लिक करताच, तो अवयव त्या संस्थेसंदर्भात नेमके कोणते व कसे काम करतो याची माहिती देखील तिथे समोरच दिसेल. त्याचबरोबर प्रत्येक संस्थेची सविस्तर माहिती त्याबरोबरच दिलेली असल्याने मानवी शरीराची रचना समजून घेणं या वेबसाईटच्या माध्यमातून फारच सोपं झालं आहे असं म्हणायला हरकत नाही.
विशेषतः विद्यार्थी, पालक आणि एनेटॉमीचे अभ्यासक असलेले विद्यार्थी किंवा या विषयात रस असलेल्या कोणाहीसाठी ही वेबसाईट खूपच उपयुक्त आहे.
या वेबसाईटवर मानवी शरीराशी संबंधित अनेक संशोधनांविषयीचे लेख व विविध माहिती सविस्तर उपलब्ध आहे.
कॅलिफोर्नियातून ऑपरेट होत असलेल्या या वेबसाईटशी अनेक डॉक्टर्स, नर्सेस, विज्ञान लेखक, संशोधक आणि अभ्यासक जोडले गेलेले आहेत. तुम्ही तुमच्या शरीराशी संबंधित कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी शरीराबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या शरीराविषयी, शरीराच्या रचनेविषयी वा कोणत्याही प्रकारच्या लहानमोठ्या शस्त्रक्रीया, वा उपचार घेण्यापूर्वी तुम्ही त्यांची पूर्ण माहिती या वेबसाईटवरून जाणून घेऊ शकता व मग तुमच्या शरीराबद्दलचा निर्णय घेऊ शकता.
No comments:
Post a Comment