Saturday

शिवाजी महाराज मराठी भाषण व शायरी

  tribalmahavikas.in       Saturday
    

नमस्कार.. जय जिजाऊ जय शिवराय, शिवजयंती निमित्ताने लहान मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या नमुना भाषणाची स्क्रिप्ट लिहा याबाबदल अनेक सूचना आल्या त्यामुळे या लेखात शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र या विषयावर वय ५ ते १० वर्षे या वयोगातील मुलांसाठी भाषणाची स्क्रिप्ट देत आहे. याशिवाय भाषणामध्ये वापरण्यात आलेली शायरी, कोटेशन,शिवाजी महाराजांचे जीवनातील महत्वाचे प्रसंग, महत्वाच्या ऐतिहासिक घटना व भाषणाची पूर्वतयारी कशी करावी याबाबद्दलची माहिती देण्यात देत आहे.

शिवाजी महाराज भाषण क्र : १

शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप

भूमंडळी..
    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा.. ! आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो मी (विद्याथ्याचे नाव) आज एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.

    आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमितने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती. सुमारे साडेतीशे वर्षानंतर ही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.

    शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजीराजे, शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवाजी महाराज अवघे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.

    शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली, शूर वीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारांमुळे शिवाजीराजे घडले. शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली.

    हि राजमुद्रा संस्कृत भाषेत होती “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” या राजमुद्राचा मराठीत अर्थ असा की, जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची हि राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.

    शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. इ.स १६४० मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. इ.स १६४५ मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंढाणा, तोरणा, सिंहगड, पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता.


    अफझलखानाने प्रतापगडावर शिवरायांना ठार मानण्याचे षडयंत्र रचले होते पण शिवरायांनी खानाच्या डाव ओळखला आणि गनिमीकाव्याचा उपयोग करीत अफजल खानाचा शिवरायांनी वध केला. याच गनिमीकाव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. या घटनेवरून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते.

    इ.स ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते, त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले. प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली, शिवाजी महाराज हे मराठी, संस्कृत भाषेचे समर्थक होते, स्रि स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले, स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी किल्ले उभारलेले. इ.स ३ एप्रिल, १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.

    प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते, स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते राजे होते, महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे. शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जयजयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे. शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभू जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राज्याला माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी धन्यवाद.!

नमुना शिवाजी महाराज जयंती भाषण क्र : २

    शिवाजी महाराज मराठी भाषण लिहलेले व शायरी : पाठी जरी शिवशंकर गरजले.. बघा मराठ्यांच्या कुशीत शिवराय जन्मले..! थाप मारताच चाले तलवारीची पाती..येथेच जुळली मराठी मनामनाची नाती.! मनामनाची नाती.! स्वराज्याचा पुरावा देत आहे तेथे एक एक गडा.! येथेच पडला शत्रुच्या रक्ताचा सडा…! शत्रुच्या रक्ताचा सडा..! अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी..! शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्यावर जिजाऊच्या पोटी झाला. (या स्क्रिप्टवर सादर केलेले भाषणाचा व्हडिओ खाली दिलेला आहे )


    शिवराय लहानपणापासूनच खोडकर होते. जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या, कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत. जिजाऊ शिवरायांना म्हणत असत शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा.! स्वराज्य निर्माण करा..!

    जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. वेळ आली होती पण हिंमत सोडली नाही. म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्ये होती, तलवार हि सर्वांच्या हातात होती, जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती.

    म्हणून एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा, नव्या युगाचा निर्माण करणारा, दुर्जनांचा नाश करता, सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना मानाचा मुजरा.!! मानाचा मुजरा.!
    
    शब्द ही पडतील अपुरे अशी शिवरायांची किर्ती.! राजा शोभून दिसे जगती..! असा तो शिवछत्रपती..राजे असंख्य झाले आजवर या जगती..! पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती..!

नमुना शिवाजी महाराज जयंती भाषण क्र : ३

सर्व प्रथम रयतेचा राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा.!!


    सन्माननीय व्यासपीठ तसेच येथे उपस्थित सर्व रसिकहो. ! सह्याद्रीच्या काड्या कपारांना हि पाझर फुटेल, डोंगर माथ्यांना हि घाम फुटेल, झाडेझुडपे ही शहरतील आणि विशाल नभाला ही त्यांच्या समोर झुकावे वाटेल, असा लोक कल्याणकारी रयतेचा राजा, मावळ्यांचा सखा, बहुजनांचा कैवारी, अशी छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही विशेषणे लावले तरीही ते कमी पडतील.




“इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर.. एक एक किल्ला नेहाळावा आठवा शिवरायांचा कारभार”

“दिली उभारी मनाला, झाल्या तलवारी वाऱ्यावरती स्वार.! हर हर महादेव गर्जले ते चार मावळ्यांच्या जोरावर..!

    अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले. असे राजे श्री शिवछत्रपती यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या मंगल दिनी शिवनेरीवर झाला. तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले आणि साऱ्या आस्मानात आनंदाची उधळण झाली. या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दिन दलितांचा कैवारी, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला.

    शिवबांवर आई जिजाऊंनी लहानपणा पासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि अवघ्या १४ व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले. स्वराज्यनिर्मीतीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले.


    त्यांनी तानाजी, सूर्याजी, बाजीप्रभू, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले. स्वराज्यनिर्मीतीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.

    शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले, संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले.

    शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले. सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर भाव या न्यायाने ते वागले. सिंहाची चाल आणि गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूची मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवबाची शिकवण.. हीच शिवबाची शिकवण..

    मित्रहो असे शिवछत्रपतींचे त्यांचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा कर्तुत्ववान व पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना शब्दही कमी पडतात.. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर… आणि विश्वासाच्या प्रमाणावर .. राज्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय.. ! एव्हढे बोलून माझे भाषण संपवतो.. जय भवानी.. जय शिवराय..

नमुना शिवाजी महाराज जयंती भाषण क्र : ४

    सर्वात प्रथम शिवछत्रपतींना मानाचा मुजरा.. क्षत्रिय कुलावंतस, राजाधिराज, योगिराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. ! छत्रपती शिवाजी महाराज की जय..! प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस, श्रीमंतयोगी, रणधूरंदर छत्रपती संभाजी महाराज की जय..! छत्रपती संभाजी महाराज की जय..!

    जय जिजाऊ..! जय शिवराय..! छत्रपती शिवाजी महाराज कि जय ..! ( या घोषणा देऊन श्रोत्यांना उत्साहित करून आपल्या सोबत जोडून घ्या ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी संयोजकाची/चा आभारी आहे..

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत, भूपती, नृपती, पृथ्वी पति, परम प्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननीष्ठ, जगविख्यात विश्व वंदनीय, राजाधिराज योगी राज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊ लेखी चा मानाचा मुजरा मानाचा मुजरा.. ! (वक्ता स्त्री असेल तर ) “छत्रपती शिवाजी महाराज की जय” हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो.. रक्त सळसळते.. छाती अभिमानाने फुलते.. ! आणि अंगावर सर्रकन काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी येथे आशा एका महान महापुरुषाची गाथा आपल्याला सांगणार आहे. ज्यांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे.

“विजेसारखी तलवार चालवुन गेला

निधड्या छातीने हिंदुस्तान हलवुन गेला. !

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला

स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला

असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.. शिवबा होऊन गेला..!


    आज या भूमीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही कि, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते.. कारण जन्मताच इथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पसरलेले आहे. कोण होते शिवाजी महाराज ? असे कोणते काम त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्षे उलटून देखील त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यात येतो.
    
    मित्रांनो इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दर्या-खोर्यात जाऊन विचारले तरी शिवाजी महाराज कोण होते ? तर ते सांगतात रुद्राचा अवतार, तो वाघाचा ठसा होता.. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना कसा होता माझा शिवबा..! कसा होता तो माझा शिवबा.. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की, त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे.

· ‘छ’ म्हणजे शिवरायांच्या अंगी छत्तीस हत्तीचे हत्तीचे बळ होते.

· ‘त्र’ म्हणजे, त्रस्त मोगलांना करणारे.

· ‘प’ म्हणजे, परत न फिरणारे

· आणि ‘ती’ म्हणजे तिन्ही जगात जाणणारे

शिस्तप्रिय जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय.

    एकेकाळी आम्ही जनावरासारखे जीवन जगत होतो. आमचा आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता, जनावर आणि माणसं तर दूरच पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते.. याच दरम्यान शिंदखेड्याचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजेच साक्षात दुर्गा, भवानी, रणचंडी जिजाऊ यांचा विवाह हा निजामशाहीचे तोडीस तोड असलेले थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.

    त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. त्यांच्या आपसात सतत लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे आणि असंख्य मराठी सैनिक नाहक मारले जायचे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत हवा होता एक पेटता अंगार.. ! अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१, १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊची पुण्याई फळाला आली कारण जनतेचा पोशिंदा, राजा शिवबा जन्मला आले.

    माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलितांच्या कैवारी जन्मला, दुष्टांचा संहार जन्मला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले.. शिवराय जिजामातेच्या संस्करा खाली हळू हळू वाढू लागले.. जिजाऊंनी शिवबाला लहानपणा पासून सत्यासाठी, न्यायासाठी लढायला शिकवले. शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या.

    जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊ कडून शिवरायांना मिळत गेली. भोळ्या-भाबड्या जनतेला गुलामी गिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायां समोर ठेवला.

    आणि म्हणून म्हणावेसे वाटते थोर तुमचे कर्म, जिजाऊ तुझे उपकार कधी फिटणार नाही. सूर्य चंद्र असेपर्यंत नाव तुमचे कधी मिटणार नाही ..!

    कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा. कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते शिवछत्रपती महाराज.. छत्रपती मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांच्या मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छाती वरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मना मनातले धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य..!

    शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र.. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार नष्ट होत नाही आणि अशा विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी केले . मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली

आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकंती करून सवंगडी गोळा केले. तानाजी, येसाजी, नेताजी,,सूर्याजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.. हर हर महादेवची गर्जना आसमंतात घुमली आणि वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा प्रवासास सुरुवात केली.

एक होते शिवाजी भिती नव्हती त्याना जगाची

चिंता नव्हती परिणामांची

कारण त्यांना साथ होती मावळ्यांची

आणि शिकवण होती जिजाऊंची

यांची जात होती मर्द मराठ्यांची

देशात लाट आणली भगव्याची झेंड्याची

आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची

म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय.. शिवरायांनी आपले शौर्य, कल्पकता, संघटन कौशल्य, राज्य धर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य आदी गुणांनी गेले अनेक शतके पारतंत्र्यात बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले.

हातात धरली तलवार.. छातीत भरले पोलाद.. हातात धरली तलवार.. छातीत भरले पोलाद.. आज साडेतीनशे वर्षे होऊ नये ही महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार यांची प्रेरणादायी आहे. म्हणून म्हणतात इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधी विसरूच शकत नाही. हा हि एक इतिहास आहे.

निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी आहे. घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती सोडून सारे ऐश्वर्य लढला.. तूच आमचे मंदिर ..तूच आमची मूर्ती..

मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी करण्याची. शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला मातेसमान मानून तिचे रक्षण करण्याची, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची, आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती शिवछत्रपतींची जयंती..!

नुसते मुखात नको हृदयात हवी शिवभक्ती..! शिवशाहीचे सारे तत्व वागण्यात तुझ्या दिसुदे ..! शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपवते.. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय… स्वराज्य जननी जिजामाता की जय.. जय जिजाऊ जय शिवराय..धन्यवाद


डॉ. अमोल कोल्हे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या ४२१ व्या जन्मोत्सवा निमित्त सिंदखेड राजा येथे केलेले भाषण क्र : ५

    आदिशक्ती तुळजाभवानी, आणि या आदिशक्तीचं, आदिमायाचं वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेब, उभ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला आणि या मातीच्या कणाला आणि मातीत जगणार्‍या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं रहावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो.

    आज या विचारपीठावर उपस्थित असणारे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब, सन्माननीय खासदार शिवसेनेचे बुलढाण्याचे संपर्कप्रमुख ढाणे वाघ प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, देशोन्नतीचे प्रकारची पोहरे, पोलीस अधीक्षक दिलीपराव भुजबळ पाटील, या जगदंब क्रिएशनने तयार केल्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे माझ्याबरोबर असलेले निर्माते ड्रॉ घनशाम राव, या मालिकेत सहनिर्माते मनोजजी आखरे पाटील.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा विश्वभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मान्यता देण्याचा अत्यंत महत्त्वाचं कारण असणारे अशी व्यक्ती कारण हा पुरस्कार स्विकारणे खरंतर पुरस्कार फार मोठा आहे, मी फक्त एक कलाकार आहे, मी फक्त एक मुखवटा घेऊन समोर जातो, मी आभासी जगात जगत असताना मी राष्ट्रनिष्ठ जागवणाऱ्या महापुरुषांची चरित्रं सांगण्याचं काम करतो. पण हा विचार स्वतःच्या आचरणात रुजवून साक्षात मृत्यूशी दोन हात करून सर्जिकल स्ट्राइक करणारे मराठा विश्‍वभूषण लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर साहेब, आज या राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थावर जमलेले आपण सर्वजण, सगळ्यांना जय शिवराय.!

खरं तर राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय ? माझ्या मातृतिर्थ सिंदखेडराजाकडे येत असताना माझ्या मनात अनेक भावना दाटून येतात, स्वराज्य म्हटलं तर स्वराज्यातील कोण तीन ठिकाणी अगदी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या तीन कोणामध्ये खरोखर स्पष्ट पडतो तो म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं नक्की स्थान कोणतं ? आणि बारकाईने बघितलं तर स्वराज्याचे हे तीन कोण जोडणारी एक समांतर रेषा येते ती समांतर रेषा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ.

जेव्हा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांबरोबर जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा जिजाऊ मासाहेब त्याग आणि समर्पणाचा एक मूर्तिमंत प्रतीक म्हणून समोर राहतात, तेव्हा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा, ती अखंड प्रेरणा स्त्रोत म्हणून जिजाऊ मासाहेब उभे राहतात, आणि जिव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा आजीची वात्सल्यमूर्ती दुधापेक्षा साईचे जास्त अप्रुप वाटणारी आजी, त्या वात्सल्याचा कमंडलू घेऊन मंगल कलश घेऊन आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून जिजाऊ मासाहेब उभ्या राहतात.

आणि म्हणून या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंती निमित्त मराठा सेवा संघानं मला मराठा विश्‍वभूषण पुरस्कार दिला आहे, त्याचा मी अत्यंत नम्रपणे माझ्या संपुर्ण टिमच्या वतीने स्वीकार करतो. कारण हा पुरस्कार स्वीकारणारा मी फक्त मुखवटा आहे, जेव्हा पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा सोशल मीडियामधून अनेक ठिकाणी मराठा विश्वभूषण ज्या ठिकाणी मराठी विश्वभुषण झालं, अनेकांकडून मेसेज आले मला वाटलं कदाचित मराठा सेवा संघाची काम करण्याची जी पद्धत आहे, त्या पद्धतीला महाराष्ट्रनं दिलेली एक वेगळी मानवंदना आहे, कारण जेव्हा मराठा या शब्दाच्यावर जेव्हा छत्रपतींच्या जिरेटोपाच्या आकाराची, जिजाऊ मासाहेबांचा डोईवरच्या पदराच्या आकाराची टोपी लावली जाते, तेव्हा मराठा मराठी कधी होतो ते समजत नाही.

आणि तो मराठी मात्र काळजात उतरल्याशिवाय राहत नाही. माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला याचं फार महत्त्वाचं कारण, महत्त्वाचं अशासाठी की जिजाऊ मासाहेब यांनी स्वराज्याला काय दिलं, जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना कुठला संस्कार दिला, मला वाटतं जिजाऊ मासाहेबांचा सगळ्यात मोठा संस्कार या स्वराज्याला दिला, छत्रपती शिवाजी महाराजांना दिला ते म्हणजे जगाच्या पाठीवर अनेक राजे आले, अनेक राजे गेले, अनेकांची साम्राज्ये उभी राहिली ,कित्येकांची साम्राज्य हे कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तुमच्या आमच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती, तरीसुद्धा साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नाव घेतलं तर मन फार आदराने झुकते याचं फार महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान.

कि शिवराय म्हणायच्या आधी जिजाऊ घ्यावं लागतं नाव, जर शिवराय असतील तर शिवराय घडतील जर जिजाऊ पाठीशी राहिला तर शिवराय उभे राहतील, आणि जर शिवराय जन्मत राहिल्या तर शिवराय जन्मात येण्याची संधी निर्माण होत राहील. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात जिजाऊ असते, फक्त १२ जानेवारी मातृदिन शिंदखेड राजाला आल्यानंतर,जिजाऊच्या पायथ्याशी मस्तक टेकवल्या नंतर जिजाऊंचा जयजकार करणार असाल तर तर येऊ नका मातृतीर्थावर, जर १२ जानेवारी येऊन जिजाऊ मातृतीर्थावर जिजाऊंच्या जन्मस्थानी येऊन आशीर्वाद घ्यायचा असेल तर तर त्या दिवसापासून पुढचे ३६४ दिवस आपल्या घरातल्या जिजाऊचा सन्मान करायला सुरुवात करा आणि मग या सगळ्या गोष्टींना एक वेगळा आयाम प्राप्त होईल.

जो पुरस्कार मी पुरस्कार साकारतो, जिजाऊंनी एक दुसरा संस्कार दिला या महाराष्ट्राच्या मातीला, मघाशी बनबरे सांगितलं की, हा पुरस्कार देत असताना जातीचा मुळीच बंधन नाही, मला एक महत्त्वाची गोष्ट हीच वाटते की, कोणत्या जातीत जन्माला यावं, कोणत्या धर्मात जन्माला यावं, कोणत्या पंथात जन्माला यावं व कोणत्या प्रांतात जन्माला यावं हे माझ्या हातात कधीच नसतं, त्यामुळे दोन पर्याय ठेवतो तुमच्या समोर, पहिला पर्याय मी अमुकच जातीत, धर्मात, अमुक-तमुक प्रांतात जन्माला आलो याचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणे हा पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय आहे मी कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठलाही पंथाने, कुठल्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वाने माझे व्यक्तिमत्त्व अशा उंचीवर नेऊन ठेवल की, माझा माझ्या जातीला, माझ्या माझा पंथाला,माझा माझ्या प्रांताला, माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. कुठला पर्याय निवडणार आहेत .. दुसरा ?? माझ्या भावांनो हा दुसरा पर्याय निवडला जातोय आणि म्हणूनच माझे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील संपूर्ण टीमने या संपूर्ण टीममध्ये अठरापगड जातीची माणस आहेत, आणि अठरापगड जातीची माणसं एका झाली म्हणजे कोणत्या जाती जमाती माणूस नाही माहित नाही, कारण आम्ही एकमेकांना नावाने हाक मारतच नाही, आम्ही एकमेकांना नावाने हाक मारतो . आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आमच्यावर संस्कार केला आहे आणि तो संस्कार आहे म्हणजे की जात जन्माशी पाठीला चिटकवून येते ती पोटाला कधी चिटकवू नका. हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला संस्कार आम्ही जगतो कारण या महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊ मासाहेबांनी रुजविलाय, हा संस्कार या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवला आहे आहे.

आणि म्हणून या माझ्या संपुर्ण टिमच्या वतीने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या जे प्रसारक आहे ते झी मराठीच्या वतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर वडिलांनी लेकराला खांद्यावर उचलून घेतलं तर लेकराची उंची वाढते या न्यायानं महाराष्ट्रातल्या तमाम तुम्ही शिवशंभू भक्तांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका उचलून धरली म्हणून ती लोकप्रिय होती म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीने विनम्रपणे हा पुरस्कार स्वीकारतो, पुरस्कार दिल्याबद्दल मी मराठा सेवा संघाचे मनःपूर्वक आभार मानतो. तुमचं सर्वांचं स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवर असेच प्रेम कायम सुरू ठेवा.

कारण एक गोष्ट सांगतो दूरचित्रवाणी आल्यापासून, टेलिव्हिजन आल्यापासून, टेलिव्हिजनच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं दूरचित्रवाणीवर संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न आजतागायत कधीही झाला नव्हता. झी मराठी वाहिनीचे मनःपूर्वक आभार आहेत कि, पहिल्यांदाच झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून स्वराज्याच्या दुसर्‍या छत्रपतींचा इतिहास हा प्रत्येकापर्यंत पोहोचवला जातोय,

आणि हा इतिहास साकारत असतांना दोन व्यवधान कायम आम्हाला बाळगावी लागतात, ती म्हणजे घरातल्यांची जेवणाची वेळ झाली म्हणून भाकरी भाजणाऱ्या, भाजी चिरणाऱ्या, भाकरीचुलीवर टाकणाऱ्या मावलीला सुद्धा माझे संभाजी महाराज कळले पाहिजे आणि प्रकांडपंडित अभ्यासक असलेल्या इतिहास संशोधकांना सुद्धा संभाजी महाराज आपलेसे वाटले पाहिजे. या दोघांचा समन्वय साधून मनोरंजनातून इतिहास मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, महाराष्ट्रातील जनता ती गोड मानून घेतलीआहे, तुम्ही सगळ्यांनी ही मालिका डोक्यावर घेतली आहे, आपले प्रेम असंच सुरू ठेवा, सगळ्यांच्या वतीने शब्द देतो मगाशी संभाजीराजांनी सांगितलं, संभाजीराजे छत्रपतींना मी परवा फोन केला होता, परवा एक मनातील संकल्पना बोलून दाखवले होते.

वेगळी स्वप्न बघायची सवय लागली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर भक्ती ठेवली, छत्रपती संभाजी महाराजांवर निष्ठा ठेवली की माणसाला एक वेगळं व्यसन लागतं ते म्हणजे आभाळाएवढी स्वप्न बघण्याचं. मी स्वप्न बघितले पूर्ण होईल की नाही आत्ता माहीत नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं एक इच्छा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा प्रसंग शेवटी रायगडा वर होईल का ? कोणत्याही दूरचित्रवाणी मालिकेच्या बजेटमध्ये याची तरतूद नसेल असं मला सांगण्यात आल्यावर मी उत्तर दिलेले त्याची काळजी महाराज घेतील आणि महाराष्ट्रातले शिवशंभूभक्त घेतील. झालं तर एक फार मोठा इतिहास या मालिकेच्या निमित्ताने घडेल. राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी प्रार्थना करतो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो, तुमचे प्रेम तुमचा लोभ असाच कायम ठेव आणि तुमच्या मनातला भगवा, तुमच्या मनातला शिवविचार असाच जागा ठेवा, येणाऱ्या काळात जर विचारलं कोणाच्या देशातून आलात तर उत्तर आलं पाहिजे ज्यांनी मरणाला सुद्धा जगायला शिकवलं आणि आलेल्या मरणाला लाजवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या , छत्रपती संभाजी महाराजांच्या देशातून आलोय.. धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय


शिवाजी महाराज यांच्या विषयी भाषणात उपयोगी पडणारी काही संग्रहित ऐतिहासिक माहिती व दाखले


· शिवरायांना स्वधर्म आणि संस्कृती यांचा प्रखर अभिमान होता यासोबत इतर धर्माच्या बाबतीत सुद्धा त्यांची वागणूक अतिशय उदारपणाची होती. पवित्र कुराणाचा मान, मशिदींना इनाम आणि परस्त्री यांबद्दल आदर्श वागणूक इत्यादी महाराजांच्या गुणांची तारीफ तत्कालीन इतिहासकार काफीखान, भीमसेन यांनी मुक्तपणे केलेली आहे.

· छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अलौकिक गुणांमुळे व बुद्धिमत्तेमुळे आतापर्यंतच्या सर्व पिढ्यांचे आदर्श ठरलेले आहेत. आणि इथून पुढेही येणाऱ्या पिढ्यांना ते कायम स्फूर्तिस्थान राहणार आहेत.

· शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून यापूर्वीच्या कित्येक शतकात आत्मविश्वास निर्माण केला शूर, सुहासी, उदार, परम धर्माविषयी सहिष्णू बुद्धी बाळगणारा असा हा थोर वंदनीय राष्ट्रपुरुष, महापुरुष शिवाजी महाराज होते.

· शिवाजी महाराजांच्या अलौकिक गुणांना व त्यांच्या कृतीला भारावून गेलेले समर्थ रामदास म्हणतात “त्यांच्या चरित्राचे मनन आणि चिंतन ही सदैव स्फूर्ती देत राहील” म्हणून शिवरायांना देव मानून रामदासांनी हा उपदेश केलेला आहे.

· मराठ्यांचा सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथात शिवाजी महाराजांविषयी न्यायमूर्ती रानडे म्हणतात ‘मराठ्यांच्या इतिहासाचे देशी व युरोपीय लेखक शिवाजींच्या चरित्रकथेने भान हरपून जातात म्हणून येथे एक महत्त्वाची गोष्ट डोळ्याआड करता येत नाही ती म्हणजे समकालीन माणसांच्या उचंबळून आलेल्या आकांक्षांचा आणि त्यांच्या कायिक व मानसिक गुणांचा तो उच्च आदर्श होता. आजही समाजातील सर्व श्रेणीतील कर्त्या पुरुषांनी शिवाजी महाराजांना नेता धुरंधर म्हणून संबोधले आहे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व निर्विवाद मान्य केलेले आहे.

· शिवाजी महाराजांच्या शूर वीर कर्तबगारीचा विचार थक्क करून टाकणारा आहे. महाराजांचे अतुलनीय साहस, कुशल मुत्सद्दीपणा, स्वधर्म आणि संस्कृतीचा प्रखर अभिमान इत्यादी गुण महाजनमध्ये प्रकर्षाने जाणवत होते.

· शिवाजी महाराजांनी राजकारणातही फार सावधपणे पावले टाकली, आलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घेतला. शिवरायांची नजर चौफेर होती शिवरायांच्या सैन्याची शिस्त वाखाणण्याजोगी होती, म्हणून इतिहासकारांनी या बद्दल अनेकदा गौरव उद्गार काढले आहेत

· शिवरायांनी इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी यांना टक्कर देण्यासाठी सर्वात प्रथम मराठी आरमार उभारलं आणि कोकणाच्या समुद्र काठावर किल्ले उभारून राजकीय विरोधकांना शह दिला.

· छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ मध्ये आपले राज्य रोहन केले आणि इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा अशी घटना घडली.

· विजापूर ,मोगलाचे विशाल समृद्ध व प्रतापी साम्राज्य याविरुद्ध शिवाजी महाराजांनी सतत पंचवीस वर्ष महाराजांनी टक्कर देऊन महाराष्ट्रात स्वतंत्र राज्याची निर्मिती केली.

· छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कर्तृत्वामुळेच रामदास स्वामी दिपून गेले आणि त्यांनी महाराजांना आपल्या भावना व्यक्त करणारे पत्र लिहिलं. या पत्रात पंधरा ओव्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र धर्म राखणारा जाणता राजाचं रामदासांनी वर्णन केलेलं आहे. या महाराष्ट्र धर्माची जाणीव आज तळागाळातल्या जनसामान्यांना झाली आहे.

· शिवाजी महाराजांची किर्ती पताका खांद्यावर घेऊन नाचण्यात हा महाराष्ट्र गेली साडेतीनशे वर्ष धन्य मानत आला आहेम्हणून शिवाजी महाराज महाराष्ट्र धर्माचा परम पावन असा महामंत्र झाला आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आणि मराठी मनाचे दैवत झालं महाराष्ट्र जनतेने त्यांना परमेश्वराचा अवतार मानून सन्मानित केलं आहे

· जातीभेद आणि अस्पृश्यता शिवकाळापूर्वी सुद्धा अस्तित्वात होती. अस्पृशांना स्पर्श करणे त्यावेळी धर्मविरोधी मानले जात असे. परंतु शिवाजी महाराजांनी या परिस्थितीचे अवलोकन केलं आणि अस्पृश्यता भेदाभेद हे स्वराज्याच्या वाढीसाठी हानीकारक आहे याची खात्री पटवून त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला त्यांच्या अनेक प्रसंगावरून दिसून येते. त्यामुळे अस्पृशता ही भावना नष्ट होऊन समाजातील प्रत्येक घटकाला खांद्यास खांदा लावून स्वराज्य निर्मितीसाठी एकत्र केलं.

· म्हणूनच की समाजात अस्पृश्य समजल्या गेलेल्या महार, मांग, रामोशी यांना किल्ल्यात प्रवेश असून देऊन अनेक अस्पृश्यता मिटवली. शिवाजी महाराजांच्या किल्यावर अनेक किल्लेदार हे महार होते, त्यांच्या हेर खात्यात बहुतेक मंडळी हि रामोशी होते व त्यांच्या सिंहासनाला चादर घालण्याचं काम मेहतर मंडळी करीत असे. वाई परगण्यातील नागेवाडी गावाची पाटीलकी महाराजांनी नागनाथ महाराला दिली होती. सामाजिक समतेच्या बाबतीत महाराज काळाच्या कितीतरी पुढे होते हेच आपल्याला यावरून स्पष्ट होतं.

· जयपुर दरबाराच्या किल्ल्यात जी बातमी पत्र मिळाली त्या बातमीपत्रात शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिल्याचे वर्णन आहेत. त्यामध्ये एक बातमीदार म्हणतो “ दख्खनचा राजाला आम्ही आग्र्यात प्रत्यक्ष पाहिलं त्याचा वर्ण गोरा आहे, नासिका सरळ आहे आणि डोळे भेदक आहेत, त्यांच्याशी बोललो व त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा त्याची संप समर्पक उत्तरे त्यांनी दिली, त्यांचा युक्तिवाद काय वर्णावा आपण ऐकतो आणि लगेच आपल्याला ते त्यांचे शब्द पडतात. यामुळे महाराजांची व्यक्तिमत्व कसे होते याचा अंदाज येतो.

· छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रसंग अतिशय सुंदर आहे. परस्त्री बद्दल आदर व सन्मान एखाद्या राजाने कसा राखावा याचा तो प्रसंग आदर्श आहे. शिवाजी महाराज अतिशय गोरेपान देखणे, रुबाबदार व राजबिंडे होते. मराठ्यांनी कल्याणचा खजिना लुटल्यानंतर तो शिवाजीराजांना समोर हजर करताना कल्याणच्या सुभेदाराची सौंदर्यसंपन्न तरुण सून त्यांच्यासमोर हजर केली पण महाराजांनी परस्त्री मातेसमान मानून या नीतिमान राजाने तिला अलंकार व वस्त्र देऊन वाटी परत सासरी सन्मानाने पाठवलं असा इतिहास आहे.

· म्हणून प्रसिद्ध कवी सुरेश भट हे यांनी या प्रसंगावर एक सुंदर काव्य रचले ते म्हणतात “अशीच आमची आई असती सुंदर रूपवती..! आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती”

· छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत बाणेदार स्वभावाचे होते आग्र्यास दिल्ली पतीच्या भेटीस गेले असतांना आपला योग्य आदर व सन्मान झाला नाही म्हणून त्यांनी परिणामांची तमा न बाळगता त्यांनी तिथेच आपल्या सूर्यपेट डोळ्यांनी “ये हम कभी बारदाश नाही सकते रामसिंग” से जळजळीत उद्‍गार संतापाने काढले व बादशाही तक्ताला तडक पाठ फिरवून निघून गेले. म्हणून ते धाडसी होते, अनेक युद्धात त्यांनी स्वतः भाग घेऊन युद्ध नेतृत्व केलं.

· छत्रपती शिवाजी महाराज उत्तम राजकारणी होते. ते उघड दांडगाई पेक्षा युक्ती प्रवृत्तीवर त्यांचा अधिक भर असे. महाराजांचं त्यांचं भूगोलाचे ज्ञान अद्वितीय होतं. त्यांस याचं प्रत्यंतर त्यांच्या लढाईसाठी निघणाऱ्या स्वारीच्या आखणीत दिसत असे. किल्ल्यांच्या जागा निवडण्यात दिसत असे.

· महाराजांची माणसे पारख करण्याचा गुण अपूर्व होता. महाराजांनी कधी शकुन अपशकुन मानला नाही. ज्यावेळी त्यांचे दुसरे पुत्र रामराजे यांच्या जन्माच्या वेळी ते पालथे जमले त्या वेळी हा अपशकुन समजला जायचा परंतु महाराजांनी उद्गार काढले की “ हा मोगलाई पालखी घालीन” म्हणून महाराजांची मुत्सद्देगिरी अजोड होती असे आपल्याला म्हणता येणार आहे.

शिवाजी महाराज यांच्या विषयच्या भाषणात उपयोगी पडेल असा अफजलखानचा वध प्रसंगाची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांचे वाढते वर्चस्व विजापूरच्या दरबाराला काही सहन होत नव्हते त्यामुळे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करावा यासाठी विजापूरच्या दरबारात हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी विजापूरच्या दरबाराची सूत्रे सुलतानची आई म्हणजे बडीसाहेबीन तिच्याकडे होते. बडीसाहेबिन ही फार कर्तबगार व कारस्थानी स्त्री म्हणून सर्व परिचित होती. म्हणून शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेला थोपविण्याकरिता तिने दरबार भरविला आणि आवाहन केले की, शिवाजी महाराजांचा बंदोबस्त कोण करू शकतो? परंतु या प्रश्नाने दरबारातील सर्व सरदार गप्प झाले. सगळीकडे शांतता पसरली कारण शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि शौर्य दरबारातील सर्व सरदारांना माहीत होते.

त्यामुळे शिवाजी महाराजांचे वर्चस्व थोपविणे करिता कोणीही पुढे यायला तयार होईना मग बडीसाहेबीने ही जबाबदारी वसईचा सुभेदार असलेला अफजलखान याला सोपविली आणि सोबत बाराहजार घोडेस्वार सैनिक आणि पायदळ दिले तसेच भक्कम तोपखाना, अग्निबाण आणि युद्ध साहित्य दिले. बडीसाहेबीनच्या आदेशानुसार इ.स १६५९ च्या च्या सप्टेंबर महिन्यात विजापूरहून अफजलखानाने पुण्याकडे प्रयाण केले.

अफजलखान वाईमार्गे पुण्याच्या दिशेने चालू लागला शिवाजीराजांना पुणे येथे मुक्कामी गाठावे अशी त्याने योजना आखली होती. परंतु त्यावेळी शिवाजी महाराजांनी जावळीच्या दुर्गम ठिकाणी असलेल्या प्रताप गडावर थांबण्याचे ठरविले होते. अफजलखान वाटेतल्या गावांची नासधूस करीत निघाला होता. वाटेत येणारे किल्ले हस्तगत करीत होता आणि दुसरीकडे स्वराज्यातील हेरांनी अफजलखानाची इथंभूत माहिती महाराजांना हकीगत करीत होते.

अफजलखान करीत असलेल्या गावांची नासधूस यामुळे महाराज व्यतीत झाले होते. त्यावेळी काही मंडळींनी महाराजांना असाही सल्ला दिला कि, महाराज आपण खानाशी सख्य करावे पण महाराजांना ते मान्य नव्हते. कारण महाराजांना या यवनांचा पूर्वी अनुभव वाईट आलेला होता. त्यांना माहीत होते की हे यवन कधीही घात करतील याचा नेम नाही.

म्हणून शिवाजी महाराजांनी एक योजना आखली आणि दुसरीकडे अफजलखानला शिवाजी महाराजांना ठार मारावे अशी गुप्त सूचना बडी साहेबीण कडून देण्यात आली होती. अफजलखानाचा वकील असलेला कृष्णाजी कुलकर्णी आणि महाराजांचा वकील गोपिनाथ बोकील यांच्यात बोलणी पार पडली.

१० नोव्हेंबर १६५९ रोजी दुपारच्या वेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट देण्याचे निश्चित झाले. या भेटी दरम्यान भव्य मंडपव सजावट करण्यात आली. शेवटी भेटीची वेळ आली आणि खाण्याच्या सोबत पंधराशे निवडक माणसे असणार होते. पुढे पालखीत बसून निघाला, खानासोबत दोन हुजरे व सय्यद बंडा हा शिपाई आणि वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे होते.

खानाच्या मनात महाराजांनी हेरल्या प्रमाणे धोका होता. कारण खान केव्हाही घात करेल असे महाराजांनी पूर्वीचं हेरले होते. म्हणून कुठेही दगाफटका होऊ नये म्हणून किंवा तसं प्रसंग ओढवल्यास आपल्या संरक्षणासाठी काय व्यवस्था करता येईल याची योजना महाराजांनी पूर्वीच आखली होती. त्यामुळे महाराजांनी अंगात जिरे घालून त्यावर झगा चढविला, डोक्यावर जिरेटोप घालून वरती पागोटे घातले, उजव्या हातात बिचावा घेऊन तो अस्तरित लपविला आणि डाव्या हाताच्या पंजाला वाघनखे चढविले.

महाराजांची खानाला भेटण्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन गडाखाली उतरले त्यावेळी त्यांच्यासोबत तानाजी मालुसरे, येसाजी कंक, हिरोजी फर्जत, पंताजी गोपीनाथ असे पन्नास मावळे होते. महाराज पालखीतून उतरले आणि चालू लागले जिवा महाला व संभाजी कावजी आत गेले तेव्हा त्यांनी खानाला महाराज घाबरले आहे असे भासविले. खान शामियान्यात एकटाच बसलेला होता शिवाजी महाराजांना पहाताच खान जोराने हसला आणि “शहाजीचा लेख” म्हणून त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागला..

धोकेबाज खानाने राज्यांची मान डाव्या काखेत दाबून उजव्या हाताने त्यांच्यावर कट्यार उगारली परंतु महाराजांनी आपल्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था पूर्वीच करून ठेवलेली असल्याने महाराज पूर्णपणे सुरक्षित होते. खानाचा हल्ला सुद्धा अत्यंत्य जीवघेणा होता आणि महाराजांना घातपाताची कुणकुण लागताच डाव्या हाताच्या वाघनखं खानाच्या पोटामध्ये घातली आणि टराटरा फाडून आतडी बाहेर काढली. तरीहि खानाने हातातील तलवारीचा एक वार महाराजांवर करण्याचा प्रयत्न केला आणि राजांनी तो वार अतिशय चपळाईने चुकवला.

महाराजांनी खानाचा मुडदा पाडला हा प्रसंग पाहून सय्यद बंडाने महाराजांवरती जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जिवा महाला पुढे येऊन त्याने त्याचे जागीच दोन तुकडे केले. खानाची दशा पाहताच त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांवर तलवार घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचाही वार चुकून त्याचाही मुडदा तेथे पाडला. खानाचा मृत्यूची बातमी सैन्यात पसरल्याने सैन्यात घबराट पसरली शिवाजी महाराजांच्या सेनेने त्यांना सुद्धा कापून काढले.

त्यावेळी अफजल खानाचा मुलगा फाजलखान व मुसेखान हे सुद्धा त्या मोहिमेत सोबत होते परंतु खानाचा मुडदा पाडल्यानंतर सैन्या बिथरले आणि मुलगे फाजलखान व मुसेखान पळून गेले. या प्रसंगात महाराज विजयी झाले होते. म्हणून महाराजांचा विरोध हा तात्विक, राजकीय होता. महाराजांच्या विरोध कुण्या एका धर्मा किंवा जातीविषयी नव्हता म्हणून नंतर महाराजांनी सैन्याच्या हालचालीची माहिती घेतली आणि अफजल खानाचा वध झालेल्या ठिकाणी त्यांचे डोळे पुरून त्यावर कबर बांधली.

शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी

· एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर..माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्यावर

· छत्तीस कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतांना पण एकही मंदिर नसतांना जे अब्जावधींचा हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात.

· अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसते फक्त शिवरायांची

· इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती

· जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता

· जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती..

· स्त्रियांचा सन्मान.. जिजा माऊलीने जन्म दिला सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान.!

· शिवनेरी किला एक शेर की कहानी है .!

· गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवाजी जाहला.!

· सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.!

· मनाला शक्ती मिळते साई बोलल्याने, पाप मुक्ती मिळते राम बोलल्याने आणि शरीरात ऊर्जा संचारते जय शिवराय बोलल्याने..!

· शिवाजी या नावाला जर उलट वाचलं तर जीवाशी हा शब्द तयार होतो जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय.!!

· छत्तीस हत्तीचे बळ असणारे…त्रस्त मोगलांना करणारे…. परत न फिरणारे…..तिन्ही जगात जाणणारे… शिस्तप्रिय आणि जिजाऊंचे पूत्र महाराष्ट्राची शान जनतेचा राजा

· विजेसारखी तलवार चालवुन गेला… निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला.. वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडुन गेला…स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला.. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला..!

· जगावं तर असं जगावं इतिहासातलं एक पान खास आपलं असावं

शिवाजी महाराज धर्माविरुद्ध कधीच नव्हते : संदर्भ माहिती

शिवाजी महाराजांच्या वेळी सगळीकडे मुसलमान सत्ता होती आणि अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्यभिषेक करून घेतला तेव्हा कृष्णाजी अनंत सभासदाने असे म्हटले आहे की, “ या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा मराठा एव्हढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही”

शिवाजी महाराजांना स्वतःच्या कल्पनेतील स्वराज्य स्थापन करतांना त्याकाळी सहाजिकच अनेक मुसलमानी सत्तेशी त्यांना अनेकदा झगडा करावा लागला, युद्ध करावे लागले परंतु याचा अर्थ असा होत नाही कि महाराजांचं मुसलमानी धर्मांची युद्ध होतं.

अन्यथा दर्यासारंग, दौलत खान, धारकरी लष्कराचा हजारी इम्रान खान, औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकार्‍यांकडे पाठवलेला वकील काझी हैदर, शिलेदार असलेला शमाखान, सरनौबत नूरखान, इब्राहीम सिद्धी, निसरी सिद्धी इत्यादी अनेक मुस्लिम धर्मीय महाराजांची कडे नोकरीस होते. याचा उल्लेख चिटणीस बखरीत आपल्याला आढळतो.

म्हणून या सर्वांना महाराजांनी नोकरीस घेऊन त्यांचं नेतृत्व राघू बल्लाळाकडे दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे हिंदू बरोबर मुसलमान असे दोन्ही धर्माचे लोक होते हे आपल्याला यावरून लक्षात येते. परंतु या मुसलमान सैनिकांनी सुद्धा कधीही फंदफितुरी कधीही केली नाही. तसेच इस्लाम धर्म याविरुद्ध हिंदू म्हणून शिवाजी महाराजांना किंवा सरदारांचा कधी द्वेष केलेला नाही. प्रत्यक्षात मुसलमानांची राज्य शिवाजी महाराज पायाखाली तुडवत असतानादेखील हे मुसलमान सैनिक इनामी इतबारी स्वराज्य उभारणीच्या कार्यात महाराजांना साथ दिली. या सैनिकांनी महाराजांच्या विरोधात कधी बंड केला नाही. हे सर्व मुसलमानी सैनिक शिवाजी महाराजांच्या राज्यात संतुष्ट होते असेच आपल्याला जाणवते.

शिवाजी महाराजांनी बुरसटलेल्या व खुळचट विचारांना कधी जवळ केले नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अतिशय प्रगत आणि प्रगल्भ होते. त्यांनी हिंदू धर्मातील बुरसटलेल्या व खुळचट विचारांना कधी जवळ केले नाही. शकुन अपशकुन यावर कधी विश्वास ठेवला नाही. त्यांनी अंधश्रद्धा कधी मानली नाही. ते विज्ञानवादी विचार सरणीचे होते आणि म्हणून जन्मावर आधारलेल्या जातवार श्रमविभागणीची त्यांनी मोडतोड करून समाजात अस्पृश्य कलंक मिळालेल्यांना त्यांनी स्वराजाच्या कार्यात सामाहून घेतले. महाराजांनी दलितांच्या हातातही शस्त्र देऊन स्वराज्याच्या कार्यात त्यांची मदत घेतली. म्हणूनच शिवाजी महाराजांचा हेर खात्यात प्रामुख्याने रामोशी लोक होते अनेकांच्या मते बहिर्जी नाईक हा रामोशी समाजाचा होता. यासोबत नानाजी मुशेखोरेकर, कर्माजी सारखे इतर अनेक रामोशी मंडळी महाराजांच्या हेरखात्यात प्रमुख पदावर होते. महाराजांची अनेक विश्वासू सहकारी व किल्लेदार हे महार ज्ञातीतील होते. मदारी मेहतर हा आग्र्याच्या अटकेच्या वेळी महाराजांबरोबर होता. तसेच अफजलखानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी बरोबर घेतलेल्या काही निवडक सहकार्यांपैकी जिवा महाला हा न्हावी समाजातून होता. “होता जीवा म्हणून वाचला शिवा” असा या भेटीच्या बाबतीत उल्लेख आपल्याला इतिहासात आढळतो.

शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले

सुरवातीला शिवाजी महाराजांची ओळख हि आदिलशहा यांच्याकडे नोकरीला असलेल्या जहागीरदारचे एक सुपुत्र होते अशी होती. त्यातही वडील शहाजीराजांचे वास्तव्य दूर बंगळुरात होते. त्याकाळी आजुबाजूला अनेक बलाढ्य मुसलमानी सत्ता होत्या शिवाय त्यावेळी या सत्ता त्यांच्या अत्यंत्य वैभवाच्या शिखरावर होत्या. त्यांच्याकडे प्रचंड सैनिकी बळ होते, अनेक कसलेले सेनानी होते, योजना कुशल माहितगार लोक सेवेत होते, अत्यंत कपटनीती व व्यावहारिक मुत्सद्देगिरीसाठी प्रसिद्ध असलेले अफजलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग असे अनुभवी व मातब्बर सेनानी रणधुरंधर लोके होते. या सत्ताधाऱ्यांकडे अफाट युद्ध साहित्य व संपत्ती सुद्धा होती. महाराजांचा एकही शत्रु सामान्य नव्हता. त्यात भर म्हणजे शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेक स्वकीय मंडळी होती. यासर्वांपूढे महाराजांचे अस्तित्व अगदी छोटे होते पण आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर महाराजांनी या सत्तेला जागोजागी सुरुंग लावले आणि शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि आपलं स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन केलं. एवढेच नव्हे तर आपल्या प्रचंड धामधुमीच्या काळात मुलकी कारभार व सैनिकी व्यवस्था, नौसेना आरमार उभारले, स्वराज्यात शासकीय कामाची आदर्श कार्यपद्धत निर्माण केली, समाज व धर्म तसेच सांस्कृतिक कार्य मोठ्या प्रमाणावर केली. म्हणून महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते असेच आपल्याला म्हणता येईल.

सुरतेची लूट : प्रसंग माहिती

त्याकाळी सुरत शहर हे अत्यंत महत्त्वाचं व्यापारी केंद्र होते तसेच पश्चिम किनाऱ्यावरचे महत्वाचे व्यापारी बंदर होते म्हणून सुरतमध्ये प्रमाणात व्यापाराची उलाढाल होत असे. त्याकाळी सुरत मध्ये हाजी सय्यद बेग व बहिर्जी बोहरा हे दोन व्यापारी प्रचंड श्रीमंत होते. त्यावेळी बहिर्जी नाईक हा महाराजांचा हेर होता. अत्यंत हुशार असलेल्या बहिजी नाईकाने सुरत शहराची खडानखडा मिळवून महाराजांना दिली. सुरतेच्या मोहीमेवर दहा हजार निवडक मावळ्यांना महाराजांनी सोबत घेतले होते त्यामध्ये मोरोपंत प्रतापराव गुजर, व्यंकोजीपंत, मकाजी आनंदराव, निळोपंत,आप्पाजी पंत,दत्ताजीपंत, मानसिंग मोरे व रुपाजी भोसले यांचा प्रमुख सहभाग होता.

६ जानेवारी १६६४ रोजी महाराजांसह सर्व सहकारी सकाळी सकाळी सुरत शहरात येऊन धडकले. सुरत लुटीच्या मोहिमेत महाराजांनी इंग्रजांच्या किंवा डच यांच्या वाटेस न जाण्याचे ठरविले होते आणि म्हणून त्यावेळी डच व्यापारांनी सुद्धा महाराजांना सहकार्य करायचे ठरविले होते.

सुरत शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली संपत्ती मुकाट्याने महाराजांच्या हवाली केली कारण महाराजांनी आपल्या सैन्यांना धार्मिक स्थळे व बायका मुलांना त्रास देऊ नये अशा सक्त सूचना दिल्या होत्या. महाराज या लुटीतून मिळालेल्या संपत्ती मधून काही भाग हा गरीब गरजूंना वाटून देणार होते. त्यामुळे महाराजांच्या लौकिकात यामुळे अधिकच भर पडली होती.

मोगल व आदिलशहा यांच्यासोबत झालेल्या धामधुमीत स्वराज्याचा मोठा खर्च झाला होता. या खर्चाची भरपाई सुरत लुटीतून निघणार होती. या सुरत लुटीच्या मालाचा हिशोब साडेआठ कोटी होन रक्कम झाली असे म्हणतात. मोगल फौज सुरतेच्या बचावासाठी येत आहे अशी कुणकुण लागताच महाराजांनी चलाखीने १० जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आपल्या सैन्यासह सुरते सोडून रायगडाचा पायथा गाठला.

भाषण करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी

१) भाषण किती वेळ करायचे हे निश्चित करा

सभेत बोलत असतांना आपले भाषण किती वेळाचे असावे हे प्रथम निश्चित करायला हवे. कारण आपण किती वेळ बोलतो यावर सुद्धा आपल्या भाषणाची परिणामकारकता अवलंबून असते. यासोबत त्या सभेमध्ये इतर वक्ते सुद्धा बोलणार असतात म्हणून आपण सभेमध्ये किती वेळ बोलणार आहे याचे भान वक्त्याला असणे आवश्यक आहे.

यानुसारच आपल्या भाषणाची पूर्वतयारी वक्त्याने करण्यास हवी. अनेकदा वेळेचे भान न ठेवल्यामुळे भाषण लांबत जाते नाविलाजाने संयोजकाला आवरते घ्या अशी सूचना करावी लागते, लांबच लांब व पल्हाळ पाडत केलेल्या भाषणाने समोर बसलेले श्रोते कंटाळतात आणि मध्येच टाळ्या वाजून भाषण संपवा असा संकेत देतात त्यामुळे भाषण परिणामकारक होणे ऐवजी ते कंटाळवाणे होते.

म्हणून भाषण करण्यापूर्वी आपण किती वेळ बोलणार आहोत याचे भान वक्त्याला असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर सभेमध्ये इतर वक्ते सुद्धा बोलणार असल्याने वेळेचे नियोजन करावे. सभेचा प्रसंग कोणता आहे ?. सभेमध्ये किती वक्ते बोलणार आहेत ? आणि सभेची वेळ कोणती आहे ? हे सर्वप्रथम वक्त्याने जाणून घेणे आवश्यक आहे.

· सर्व साधारणपणे दहा मिनिटा च्यावर बोलू नये,

· शाळा अथवा महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमात साधारणपणे तीस मिनिटं बोलता येते.

· प्रमुख पाहुणे म्हणून कुठे आपल्याला बोलवले असल्यास आणि आपल्या शिवाय अन्य एक दोन वक्ते बोलणार असल्यास अशावेळी भाषण पंधरा ते वीस मिनिटात संपवावे.

· कधीकधी एखाद्या मुख्य विषयावर आपल्याला प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित केले असेल तर ४० ते ४५ मिनिटे भाषण करावे.

· अलीकडच्या काळात दीर्घ भाषण ऐकण्यामध्ये प्रेक्षकांना रुची दिसत येत नाही म्हणून थोडक्यात व मुद्देसूद प्रभावी भाषण करावे

· भाषण एकांगी करू नये, भाषणात सर्व विषयांचा समावेश करावा त्याचबरोबर कोटेशन्स, शेर शायरी, चारोळी, कवितेच्या ओळी वापरून आणि प्रसंगावधान राखून केलेले भाषण भाव खाऊन जाते.

२) भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी श्रोत्यांना नियंत्रणात घ्यावे

आपण भाषण किती वेळ करावे हे निश्चित झाल्यानंतर श्रोत्यांवर नियंत्रण कसे मिळवावे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भाषणात यश मिळविण्यासाठी श्रोत्यांमध्ये सुरुवातीला विश्वास निर्माण करणे हे सर्वात महत्वाचे असते.

जो वक्ता सुरुवातीच्या दोन-तीन मिनिटात श्रोत्यांना नियंत्रणात घेतो त्या वक्त्याचे भाषणाला निम्मे यश सुरुवातीलाच मिळालेले असते.

श्रोत्यांना सुरुवातीच्या दोन-तीन मिनिटात नियंत्रणात घेतल्यास श्रोता आणि वक्ता यांच्यात चांगल्या प्रकारे संवाद निर्माण होऊ श्रोते आपले भाषण ऐकण्यास उत्सुक बनतात.

आचार्य अत्रे म्हणतात, अत्यंत आत्मविश्वासाने व मोठ्या आवाजात भाषणाला सुरुवात करावी त्यामुळे सुरुवातीलाच श्रोते शांत होतात. कारण वक्ता हा अतिशय आत्मविश्वासाने बोलत आहे याची खात्री श्रोत्यांना होते. अनेक वक्ते भाषणाच्या सुरुवातीला एखादा विनोद सांगतात यामुळे श्रोते मन मोकळे हसतात आणि यावेळेत वक्ता श्रोत्यांना आपल्या ताब्यात घेतो.

तसेच काही वक्ते सुरुवातीला एखाद्या कवितेच्या ओळी शेर शायरी किंवा सुविचार सांगून भाषणाची सुरुवात करतात यामुळे सुद्धा श्रोत्यांना ताब्यात घेता येते. काही वक्ते सभेवर ती नियंत्रण मिळवताना रंजक गोष्टीने सुरुवात करतात जसे आचार्य अत्रे यांनी एकदा फर्गुसन कॉलेजमध्ये भाषणाची सुरुवात करताना सभी स्त्री-पुरुष हो असे म्हटल्यावर वरच्या मजल्यावर एका विद्यार्थ्याने ‘ओ’ असे उत्तर दिले त्यामुळे सभेतील लोक हसायला लागले. मात्र आचार्य अत्रे यांनी लगेच वरच्या मधल्या कडे कटाक्ष टाकत म्हणाले की, “मी तुम्हाला नाही म्हटले तर सभी स्त्री-पुरुषांना उद्देशुन बोललो” यामुळे सभेत हास्यकल्लोळ उडाला टाळ्यांचा कडकडाट झाला.

अशाप्रकारे आचार्य अत्रे यांनी सुरुवातीस श्रोत्यांना ताब्यात घेतले आणि नंतर अतिशय प्रभावीपणे आपले विचार मांडले. म्हणून भाषणाची सुरुवात करतांना सर्वात प्रथम सुरुवातीच्या काही मिनिटात श्रोत्यांना आपल्या ताब्यात घेणे महत्त्वाचे असते यावरच पुढचे भाषण यश अवलंबून असते.

३) श्रोत्यांची मानसिकता समजून घ्या

एखाद्या वक्त्याचे भाषण परिणामकारक होण्यासाठी वक्त्याला श्रोत्यांविषयी सखोल माहिती असणे गरजेचे आहे त्यात सर्वात प्रथम

· आपण कोणासमोर बोलणार आहोत ?

· आपण किती वेळ बोलणार आहोत ?

· बोलण्याचा प्रसंग कोणता आहे ?

· श्रोत्यांची संख्या किती आहे ?

· बोलण्याची वेळ कोणती आहे ?

· वातावरण कसे आहे व श्रोते किती वेळ या वातावरणात बसू शकतात ?

· श्रोते कोणकोणत्या वयोगटातील आहेत ?

· श्रोत्यांचे शिक्षण काय झालेले आहे ?

· श्रोते शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे का ?

· श्रोत्यांची सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक पार्श्वभूमी कोणती आहे ?

· श्रोत्यांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण किती आहे ?

· श्रोत्यांना आपल्याकडून काय बोलणे अपेक्षित आहे

· श्रोते कोणत्या उद्देशाने भाषण ऐकण्यासाठी आलेले आहेत ?

या प्रकारची माहिती वक्त्याने भाषण करण्यापूर्वी माहिती करून घेणे गरजेचे आहे तेव्हाच एखादा वक्ता सभेवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो.

४) भाषण करताना श्रोत्यांशी संवाद साधा

उत्कृष्ट वक्ता हा श्रोत्यांशी सहजपणे संवाद साधू शकतो याचे उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करतांना श्रोत्यांशी उत्कृष्ट पणे संवाद साधतात. श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांची उत्तर घेतात व वेळोवेळी श्रोत्यांना बोलते करतात अशा रीतीने श्रोत्यांशी संवाद साधून केलेले भाषण श्रोते आणि वक्ता यांच्यामध्ये एक भावनिक संबंध निर्माण करतात. अशावेळी वक्त्याला भाषण करताना वेगळीच ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणून भाषण करताना मध्ये मध्ये श्रोत्यांना प्रश्न विचारून किंवा एखाद्या गोष्टीचे समर्थन घेऊन खुले प्रश्न विचारून भाषणात सामावून घेणे महत्त्वाचे आहे.

५) वक्त्याने श्रोत्यांच्या दृष्टिकोनातून बोलावे

एखादा व्यक्ती भाषण करताना आपल्याला एखादा विषय मांडायचा आहे आणि त्या विषयाची आपण तयारी केलेली आहे म्हणून समोरच्या श्रोत्यांची मानसिकता न लक्षात घेता त्यांच्या गळी उतरवीत असतो. परंतु हे उत्कृष्ट वक्त्याचे लक्षण नाही. म्हणून आपण काय तयारी केली यापेक्षा प्रेक्षकांना काय हवे हे महत्वाचे असते आणि यावरच भाषणाचे यश अवलंबून असते.

वक्ता ज्यांच्या समोर बोलणार आहोत त्यांचा दृष्टिकोन लक्षात घेणे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ जर एखाद्या वक्ता कामगार सभेमध्ये भाषण करत असेल तर त्यावेळी कामगारांचा फायदा नेमका कशात आहे हे त्याने लक्षात घेतले पाहिजे म्हणून कामगारांच्या हिताचे विषय मांडता आले पाहिजे जसे की पगार वाढ, विविध प्रकारच्या शैक्षणिक व निवासी सवलती, कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक, कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा हे वक्त्याने लक्षात घेऊन भाषण करावे.

आपल्या भाषणातून कामगारांचा फायदा कसा होणार आहे असे सर्वांगीण विश्लेषण करायला हवे तरच समोर बसलेल्या श्रोत्यांना वक्ता आपल्यातला आहे याची जाणीव होती व आपल्या हितासाठी बोलत आहे असे जाणीव झाल्यावर व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. नसता आपण तयारी केलेली एखादे भाषण आहे आणि म्हणून ते समोरच्याचा दृष्टिकोन न बघता केल्यामुळे असे अशा प्रकारच्या भाषणाला यश मिळत नाही.

६) भाषण व तर्कशुद्ध विचार

आपण एखाद्या सभेमध्ये भाषण करत असाल तर विषयाची मांडणी तर्कशुद्ध पणे करण्यास हवी. आपण मांडत असलेल्या विषयाचा मजकूर पुराव्यानिशी व तर्कशुद्ध पणे श्रोत्यांसमोर मांडल्यास भाषण अधिक परिणामकारक होते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज ठाकरे हे नेहमी आपल्या भाषण तर्कशुद्ध पणे व मुद्देसूद पणे श्रोत्यांसमोर मांडत असतात. यावेळी वेगवेगळे पुरावे व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप श्रोत्यांसमोर सादर केल्याने विश्वासहर्ता वाढते आणि भाषण परिणामकारक होते.

७) बोली भाषेत भाषण

आपले विचार सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वक्त्याने शक्यतो श्रोत्यांच्या बोली भाषेचा उपयोग करण्यास हवा. भाषण करणे म्हणजे आपण मांडत असलेला एखादा विचार श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे होय. आपल्याला श्रोत्यांच्या बोलीभाषेत त्यांच्याशी संवाद साधता आला तर ते भाषण अधिक प्रभावी होते. म्हणून आपल्याला शक्य झाल्यास श्रोत्यांशी त्यांच्याच बोलीभाषेमध्ये संवाद साधावा किंवा श्रोत्यांची बोलीभाषा अवगत नसल्यास सुरुवातीची काही वाक्य त्यांच्या बोली भाषेत बोलण्याचा प्रयत्न करावा यामुळे वक्ता आपल्यातीलच एक व्यक्ती असल्याची जाणीव होते व वक्त्याविषयी आपुलकी निर्माण होते. म्हणून एखाद्या सभेत बोलताना श्रोत्यांच्या बोलीभाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करावा.

logoblog

Thanks for reading शिवाजी महाराज मराठी भाषण व शायरी

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

ads